निवृत्तीपूर्वीच पूर्ण पीएफ काढता येणार! भविष्य निर्वाह निधी काढण्याच्या नियमांत मोठय़ा बदलाची योजना

केंद्र सरकार पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याची योजना आखत आहे. नव्या नियमानुसार पगारदार लवकरच निवृत्तीपूर्वी त्यांच्या पीएफ भविष्य निर्वाह निधीतून संपूर्ण रक्कम किंवा त्याचा मोठा भाग काढू शकतील. अहवालानुसार, नवीन नियम लागू झाल्यानंतर कर्मचारी दर 10 वर्षांनी त्यांच्या पीएफचा मोठा भाग काढू शकतील. सध्याच्या नियमांनुसार, संपूर्ण ईपीएफ रक्कम निवृत्तीनंतर किंवा 2 महिने बेरोजगार राहिल्यानंतरच काढता येते.

 जर नवीन प्रस्ताव लागू झाला, तर तुम्ही दर 10 वर्षांनी एकदा तुमच्या पीएफ निवृत्ती निधीचा मोठा भाग (संभाव्यतः 60 टक्के किंवा त्याहून अधिक) काढू शकाल. यामुळे लोकांना 30, 40 वर्षे वयाच्या किंवा नोकरीच्या मधल्या टप्प्यातही त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पीएफ निधीचा वापर मोठय़ा गरजांसाठी करता येईल.

सरकार संपूर्ण रक्कम काढण्यासाठी नियम किंवा मर्यादा लागू करण्याचा विचार करत आहे. उदाहरणार्थ, दर 10 वर्षांनी 60 टक्क्यांपर्यंत काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

सध्याचा नियम काय?

l सध्याच्या नियमानुसार, 58 वर्षांच्या वयानंतर किंवा 2 महिन्यांच्या बेरोजगारीनंतरच निवृत्ती निधी काढता येतो.

l विशेष परिस्थितीत (वैद्यकीय, घर खरेदी, शिक्षण, लग्न) तुम्ही मर्यादित रक्कम काढू शकता. याशिवाय तीन वर्षांच्या ईपीएफ सदस्यत्वानंतर तुम्ही घर बांधण्यासाठी 90 टक्क्यांपर्यंत पैसे काढू शकता.

l गेल्या महिन्यात सरकारने आपत्कालीन परिस्थितीत किंवा गरज पडल्यास 72 तासांत पीएफ खात्यातून 5 लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली. पूर्वी ही मर्यादा 1 लाख रुपये होती.