स्वदेशी आयएनएस निस्तार नौदलाच्या ताफ्यात, समुद्रात पाणबुडीच्या मदतीसाठी धावणार; तत्काळ दुरुस्ती होणार

हिंदुस्थानी नौदलाची पॉवर आता आणखी वाढली आहे. नौदलाच्या ताफ्यात आज देशातील पहिले स्वदेशी डाइव्हिंग सपोर्ट जहाज आयएनएस निस्तारचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम येथील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये आयएनएस निस्तारचा ताफ्यात समावेश करण्यात आला. आयएनएस निस्तारला देशातच डिझाईन करण्यात आले असून याचे निर्माण कार्य करण्यात आले आहे. हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडने 8 जुलै 2025 ला हिंदुस्थानी नौदलाकडे सोपवले होते, परंतु आज या जहाजाला अधिकृतरीत्या नौदलाच्या ताफ्यात उतरवले आहे. आयएनएस निस्तारमुळे हिंदुस्थानची पॉवर आणखी वाढेल.

हिंदुस्थानने 23,622 कोटी रुपयांची शस्त्रे निर्यात केली आहेत. आता पुढचे लक्ष्य हे 50 हजार कोटी रुपयांचे आहे, असे संजय सेठ म्हणाले. या वेळी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांची खास उपस्थिती होती. नव्या आयएनएस निस्तारचा नौदलाच्या ताफ्यात समावेश झाल्यामुळे आता नौदलाची डायव्हिंग क्षमता आणि समुद्रातील खोल पाण्यात काम करण्याची क्षमता आणखी वाढेल, असे दिनेश त्रिपाठी या वेळी म्हणाले.

संस्कृत भाषेतून घेतले नाव

निस्तार हे नाव संस्कृत भाषेतून घेण्यात आले आहे. याचा अर्थ स्वातंत्र्य किंवा बचाव असा होता. आयएनएस निस्तारचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे 118 मीटर लांब आणि 10 हजार टन वजनी जहाज आहे. निस्तार जहाज हे समुद्रात खोल 300 मीटर पर्यंत जाऊ शकते. हे जहाज डीएसआरव्हीसाठी मदरशीपचे काम करते. जर समुद्रात पाणबुड्डीला कोणतीही अडचण आली तर हे जहाज बचाव कार्य आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी जवानांना एक हजार मीटर खोल पाण्यात उतरवू शकते.