
आरेवारे समुद्रावर फिरायला गेलेले चौघेजण समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी रत्नागिरीत घडली. मयतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. उज्मा शामशुद्दीन शेख (18),उमेरा शामशुद्दीन शेख (29), जैनब जुनैद काझी (26),जुनैद बशीर काझी(30) अशी मयतांची नावे आहेत. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी चारही मृतदेह पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
उज्मा शामशुद्दीन शेख आणि उमेरा शामशुद्दीन शेख या मुंब्रा येथील रहिवासी असून रत्नागिरीत नातेवाईकांना भेटायला गेल्या होत्या. शनिवारी सायंकाळी उज्मा आणि उमेरा या नातेवाईक असलेल्या जैनब आणि जुनैदसोबत आरेवारे बीचवर फिरायला गेल्या. बीचवर मजा करत असताना अचानक उसळलेल्या महाकाय लाटेने चौघेही पाण्यात ओढले गेले.
चौघांनी जीव वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. स्थानिक नागरिकांनीही चौघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. समुद्र खवळलेला असताना पर्यटकांनी पाण्यात जाऊ नये असे आवाहन नागरिकांना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले.