
बनावट नोटा प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला नऊ महिन्यांनंतर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. पोलिसांनी अटकेची कारवाई करण्यात विलंब करून कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही. त्यावरून बनावट नोटा जप्तीच्या कारवाईवरच शंका उपस्थित होत असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता. हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आणि आरोपी अब्दुल रझाकची 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. या निर्णयाने पोलिसांना मोठा झटका बसला आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अब्दुलला ताडदेव पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून 7200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली होती. ‘दर्द से हम दर्द तक ट्रस्ट’च्या वतीने आर्थर रोड तुरुंगात क्लिनिक राबवले जात आहे. या माध्यमातून संस्थेचे अॅड. प्रकाश साळशिंगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. मंगेश सौंदाळकर यांनी रझाकतर्फे बाजू मांडली. त्यांनी पोलिसांच्या कारवाईतील विविध त्रुटींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यांच्या युक्तिवादाची प्रधान सत्र न्यायाधीश ए. सुब्रमण्यम यांनी गंभीर दखल घेतली आणि सरकारी पक्षाचा विरोध धुडकावत आरोपी रझाकची जामिनावर सुटका केली.


























































