
रात्री झोपलेल्या आपल्या सहकाऱ्यांचे मोबाईल चोरून पसार झालेल्या एका लष्करी जवानाला कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल चोरून त्या जवानाने कोईमतूर गाठले होते. पोलिसांनी त्याला पकडून त्याच्याकडून चोरीचे 21 मोबाईल हस्तगत केले आहेत.
लष्करी जवान बी. अल्फा तुइपांग (25) असे सहकाऱ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या त्या जवानाचे नाव आहे. 21 जूनच्या रात्री गॅरिसन बटालियन कुलाबा, मिलिटरी स्टेशन काकोरा, युनिट लाईन एरिया येथील बराकीमधून झोपलेल्या लष्करी जवानांचे 30 मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार कफ परेड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्या रात्रीपासून जवान तुइपांग हादेखील बेपत्ता झाला होता. घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करीत असताना चोरलेल्या मोबाईलपैकी एका मोबाईलचे लोकेशन चेन्नईतील कोइमतूर येथील मिळाले. त्याआधारे कफ परेड पोलिसांच्या पथकाने तेथे धडक देऊन तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने एका लॉजमध्ये थांबलेल्या तुइपांग याला पकडले. त्याच्याकडून चोरीचे 21 मोबाईल हस्तगत करण्यात आले. तुइपांग हा मूळचा मिझोरमचा असून त्याची मुंबईत पोस्टिंग होती. त्याला न्यायालयात हजर केले असता 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


























































