
आता रेल्वे तिकीटसुद्धा हप्त्यावर म्हणजे ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. लांबपल्ल्याच्या रेल्वेचे तिकीट खरेदी करताना ईएमआयचा पर्याय दिसणार आहे. त्यासाठी रेल्वेने एक स्पेशल टूर पॅकेज आणले आहे. हे पॅकेज घेतल्यानंतर प्रवाशांना तिकिटाचे पैसे हप्त्याने चुकवता येतील. ईएमआयद्वारे ही रक्कम भरता येईल. रेल्वेकडून देशातील प्रसिद्ध तीर्थस्थळांसाठी स्पेशल टूर पॅकेज देण्यात येते. भारत गौरव यात्रा नावाने हे पॅकेज असते. या योजनेंतर्गत ट्रेनचे टूर पॅकेज सहज बुक करता येते आणि प्रवास झाल्यानंतर हप्त्याने तिकिटाचे पैसे भरू शकतो.
आयआरसीटीसीची भारत गौरव ट्रेनसाठीच ही ऑफर आहे. हे ट्रेन तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना ईएमआयचा पर्याय मिळतो. समजा तुम्ही 13 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंतच्या भारत गौरव ट्रेनचे तिकीट बुक केले. या ट्रेनच्या इकोनॉमी क्लासचे भाडे हे 18460 रुपये प्रति व्यक्ती आहे. त्यामध्ये स्लीपर क्लासचे ट्रेन तिकीट, हॉटेल खर्चाचा समावेश आहे. कुटुंबासोबत प्रवास करायचा असेल तर रक्कम वाढते, त्यामुळे ईएमआयची सुविधा दिली आहे.