
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत झाले होते. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने बोलणाऱ्या नेत्यांमध्ये शशी थरूर यांचे नाव समाविष्ट केले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, काँग्रेसने सभागृहात बोलणाऱ्या सहा नेत्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात शशी थरूर यांचे नाव नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवरील विशेष चर्चेत काँग्रेसकडून गौरव गोगोई, प्रियंका गांधी-वाड्रा, दीपेंद्र हुडा, प्रणिती शिंदे, सप्तगिरी उलाका, बिजेंद्र एस. ओला यांच्या नावाचा समावेश आहे. शशी थरूर यांनी संसदेत वक्त्यांच्या यादीत आपले नाव समाविष्ट नसल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांच्या प्रश्नावर ते फक्त ‘मौन व्रत, मौन व्रत’ एवढेच म्हणाले आणि हसत सभागृहात निघून गेले.
ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आणि पाकिस्तानच्या भ्याड कृत्याबद्दल जगाला संदेश देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेसने शशी थरूर यांचे नाव घेतले नव्हते. असे असूनही सरकारने त्यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ अमेरिका आणि इतर देशांच्या दौऱ्यावर पाठवले. त्यानंतर शशी थरूर आणि काँग्रेसमध्ये तणाव असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता ऑपरेशन सिंदूरवर बोलणाऱ्या वक्त्यांमध्ये शशी थरूर यांचे नाव नाही. तसेच त्यावर थरूर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचीही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.