लेख – भारतीय स्वातंत्र्याचे अग्रदूत

<<<प्रा. डॉ. ललिता शिंदे (बोकारे) >>>

‘फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’ अर्थात ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे लोकमान्य टिळकांचे वर्णन सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी 1915 साली प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या पुस्तकात केले होते. या पुस्तकातील लेखनाविरुद्ध लंडनच्या न्यायालयात टिळकांनी अब्रुनुकसानीचा दावा केला. हा अब्रुनुकसानीचा दावा टिळक हरले; पण इंग्रज लेखक चिरोल यांचे टिळकांबाबत केलेले वर्णन सार्थ ठरले. भारतीय जनमानसात जुलमी ब्रिटिश सत्ताधीशांविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण करून स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करावयास लावणारे टिळक हे भारतीय ‘स्वातंत्र्याचे अग्रदूत’ होते.

राजकीय हक्क मिळविण्यासाठी केवळ अर्ज, विनंत्या करून चालणार नाही. मवाळ, नेमस्तवादी नेत्यांच्या मागण्यांना इंग्रज सरकार बधत नाही. राजकीय मागण्यांच्या मागे जनशक्तीचे सामर्थ्य उभे केले तरच स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करता येईल असे लोकमान्य टिळक सांगत. त्यांनी सबंध भारतीय जनतेला ’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ असा मूलमंत्र दिला. अशा थोर स्वातंत्र्यसेनानीचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीत झाला. इतिहासापासून जनतेला स्फूर्ती मिळते हे ओळखून टिळकांनी शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव उत्सवाचे घरोघरी होणारे वैयक्तिक स्वरूप पालटून लोकजागृतीसाठी सार्वजनिक उत्सव सुरू केले. त्यानिमित्ताने व्याख्याने, पोवाडे, मेळावे इ. साधनांनी राजकीय जागृती केली. सार्वजनिक सभेच्या माध्यमातून लोकांच्या न्याय्यहक्क मागण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून ब्रिटिश साम्राज्यशाहीला त्यांनी लढा द्यायचे निश्चित केले. लोकजागृतीचे साधन म्हणून त्यांनी गोपाळ गणेश आगरकर, चिपळूणकर, आणि ना. म. जोशी यांच्यासमवेत ‘न्यू इंग्लिश स्कूल’ तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. सर्वसामान्य जनतेला राष्ट्रीयतेचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी शाळा, कॉलेजची स्थापना केली.

जनतेत राष्ट्रीय जागृती निर्माण करणे हे खूप गरजेचे होते. 1881 साली त्यांनी आगरकरांसमवेत ‘केसरी’ व ‘मराठा’ या वृत्तपत्रांची स्थापना केली. प्रारंभी आगरकर हे ‘केसरी’चे संपादक होते, तर टिळक हे ‘मराठा’चे संपादक होते. 1896 साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांच्यात जागृती घडवून आणण्यात टिळकांचा मोठा वाटा होता. कायद्याच्या चौकटीत राहून जनआंदोलन करणे ही टिळकांची भूमिका होती. त्यांचे हे तंत्र खूप अभिनव होते. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ पसरली. टिळकांनी पुढाकार घेऊन जनतेला मदत करण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर सर्व परीने प्रयत्न केले. ब्रिटिश अधिकारी रँड आणि त्यांच्या सैनिकांनी केलेल्या अतिरेकी वर्तनामुळे जनतेत प्रचंड दहशत निर्माण झाली. पुण्यातल्या प्लेगच्या साथीत रोग्यांवर तसेच नागरिकांच्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी पुण्याजवळ चिंचवड या गावी राहणारे दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव हे चापेकर बंधू यांनी रँड या अधिकाऱ्याचा खुनाचा बेत आखला. 23 जून 1897 रोजी रँड घोडागाडीतून जात असताना दामोदर चापेकर यांनी वाटेत गोळ्या झाडून रँड या जुलमी अधिकाऱ्यास ठार मारले. या घटनेमुळे निरपराध जनतेचा अनन्वित छळ झाला. चापेकर बंधूवर खुनाचा आरोप ठेवून तिघा भावांना फाशीची सजा देण्यात आली.

टिळकांनी ‘केसरी’त अग्रलेख लिहून खुनाचा धिक्कार केला. जनतेला विनाकारण छळू नये यासाठी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ हा खरमरीत अग्रलेख लिहिला. या वृत्तपत्रीय लिखाणांमुळे टिळकांना राजद्रोहाखाली अटक करण्यात आली. राजद्रोहाच्या या खटल्यात टिळकांना न्यायमूर्ती स्ट्रेची यांनी दीड वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ‘या घटनेमुळे सर्व राष्ट्र आज अश्रू ढाळत आहे’ असे हृदयंगम वर्णन केले. एवढेच नव्हे तर, जर्मन पंडित मॅक्समुल्लर यांनी ‘अखंड ज्ञानोपासना करणाऱया टिळकांची सुटका करावी,’ असे पत्र तत्कालीन भारतमंत्र्यांना दिले.
1905 साली ‘फोडा आणि झोडा’ या कुटिल धोरणाचा अवलंब करून ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी बंगालची फाळणी केली. या फाळणीद्वारे हिंदू व मुसलमान समाजांमध्ये दुहीचे, कलहाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न इंग्रज अधिकारी व्हॉईसराय लॉर्ड कर्झन याने केले.

लॉर्ड कर्झन हा कडवा साम्राज्यवादी व्हॉईसराय होता. इंग्रजांनी बंगालची फाळणी हिंदू-मुस्लिम दुहीसाठी केली; परंतु झाले उलटेच! जनतेत ऐक्याची भावना उलट वाढली. बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय, बिपीनचंद्र पाल म्हणजेच लाल-बाल-पाल हे राष्ट्रीय नेते एकत्र येऊन सनदशीर मार्गाने त्यांनी फाळणीचा विरोध केला. जनतेत ‘स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, आणि स्वराज्य’ असा चतुःसूत्रीचा कार्यक्रम टिळकांच्या नेतृत्वातून काँग्रेसने लोकांसमोर ठेवला.

सर्वसामान्य जनतेला राष्ट्रीय चळवळीत सहभागी करून घेतले. स्वदेशीद्वारे जनतेत स्वावलंबनाची भावना, बहिष्काराद्वारे राष्ट्रीयत्वाची जाणीव आणि राष्ट्रीय शिक्षणाद्वारे भारतीयांमध्ये, राष्ट्रनिष्ठेची जागृती करणे, तर स्वराज्याद्वारे राष्ट्रप्रेम, राज्यवादाची प्रेरणा निर्माण करणे हा चतुःसूत्री कार्यक्रमाचा हेतू होता. चतुःसूत्री कार्यक्रमामुळे जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण तर झालीच; परंतु ब्रिटिश साम्रज्यवादाविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण होण्याचे प्रयत्न साध्य झाले. यात टिळकांचा फार मोठा वाटा होता. वंगभंगानंतर स्वराज्याच्या प्रेरणेने भारतीय जनतेला त्यांनी प्रेरीत केले. काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात काँग्रेसच्या व्यासपीठावरून ‘स्वराज्य’ हा शब्द प्रथम उच्चारला गेला. हे टिळकांच्या विचारांतूनच शक्य झाले.

ब्रिटिश राजवटीबद्दल भारतात निर्माण झालेल्या असंतोषाचे जनक टिळकच होते. लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे की,‘आपला जन्म कोणत्याही देशात झालेला असो, तो केवळ आपल्या बायकांमुलांसह चैनीत राहाण्यासाठी नाही. यापेक्षा काहीतरी उच्च ध्येय साध्य करण्यासाठी आहे. या उच्चतर ध्येयाची मर्यादा इतकी श्रेष्ठ आहे की, या मार्गाने जाता जाता अखेर त्याला परमेश्वराचे तादात्म्य प्राप्त होते. अशा तऱ्हेचे प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. आणि ही कर्तव्यजागृती ज्याच्या ज्याच्या मनात ज्या ज्या क्षणी निर्माण होईल त्या त्या क्षणी त्याने स्वार्थत्याग करून आणि संकटाची पर्वा न करता परमेश्वरावर भरवसा ठेवून निष्कामबुद्धीने कार्यास लागले पाहिजे.’

लोकमान्य टिककांच्या या विचारांतच त्याचे थोरपण दडलेले आहे. लोकमान्य टिळकांमुळे लहानथोर जनमानसात, गल्लीबोळात, चौक, हमरस्त्यात, शहर, महानगरात, सबंध भारतात ब्रिटिश सरकारविरोधी वातावरण निर्माण झाले. पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे वाटचाल त्यांच्यामुळेच सुकर झाली. तत्कालीन कार्यकर्त्यांनी त्यांना ‘स्वातंत्र्याचा सूर्य’ असे म्हटले ते सार्थकच आहे.

राष्ट्रीय शिक्षण, गणेशोत्सव, शिवजयंती अशा चळवळी करून त्यांनी लोकांना स्वातंत्र्योत्सुक बनविले. निष्कलंक चारित्र्य, संघटना चातुर्य, मुत्सद्देगिरी, अलोट धैर्य, असीम त्याग या आपल्या गुणवैशिष्ट्यांनी ते अखिल भारताला ललामभूत ठरले. त्यांच्या असामान्य निर्भीड धैर्यामुळे आणि त्यागामुळे लोकांच्या अंतःकरणात त्यांना अढळ स्थान प्राप्त झाले. त्यांच्या अभूतपूर्व देशभक्तीमुळे ते खरे ‘लोकमान्य’ झाले. 1 ऑगस्ट 1920 रोजी दीर्घ आजाराने त्यांचे निर्वाण झाले. या महामानवाच्या अंत्ययात्रेस सबंध भारतभरातून जनतेचा सागरासारखा समुदाय मुंबईत आला. त्यांच्या थोर व्यक्तित्वापुढे श्रद्धांजली देताना अनाहुतपणे ओठावर शब्द येतात.

‘असा मोहरा झाला नाही, पुढे न कधी होणार
लोकमान्य टिळक हे नाव जगात गर्जत राहणार’