
उभी राहिलेली भात पिके एका रात्रीत उध्वस्त झाल्याने मोखाड्यातील शेतकरी हवाल दिल झाला आहे. रानडुकरांनी बळीराजाचा घास हिरावला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांवर पुन्हा भाताची लावणी करण्याची वेळ आली आहे. यापुर्वी ही शेतातली रताळे आणि कंदमुळे पीक रानडुकरांनी फस्त केले असल्याने शेतकऱ्यांना आता पुन्हा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दरम्यान, पिकांवर डल्ला मारणाऱ्या रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मोखाड्यात खरीप पिकांच्या लावणीचे हंगाम सुरू आहे. नैसर्गिक आपत्ती, मजुरांची कमतरता, वाढत्या बी-बियाणे आणि खतांच्या किमती यावर मात करत शेतकरी खरीपाची शेती करत आहेत. मोखाड्यात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एकमेव खरीपाचेच पीक घेतले जाते. या पिकाच्या उत्पन्नावरच येथील शेतकऱ्यांना वर्षभर गुजराण करावी लागते. मोखाड्यातील मोरचोंडी, निळमाती, दांडवळ या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी भातपिकाची लावणी केली होती. नुकत्याच लावणी केलेल्या भातपिकावर एका रात्रीत रानडुकरांनी हल्ला केला असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
एका रात्रीत होत्याचे नव्हते
यंदा वरुणराजाने चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांनी भात लावणी वेळेवर केली. काही शेतकऱ्यांनी पारंपरिक तर काहींनी यांत्रिक पद्धतीने भात लावणी केली आहे. याच लावणी केलेल्या भातपिकावर रानडुकरांनी आपला मोर्चा वळवला आणि एका रात्रीत होत्याचे नव्हते केले. रानडुकरांच्या या कारनाम्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
दिवसा शेतात काम करायचे आणि रात्री लावणी केलेल्या पिकांची राखण करावी लागत आहे. मात्र डुकरांचे मोठे कळप येऊन भातपीक उद्ध्वस्त करतात. त्यामुळे वनविभाग आणि कृषी
विभागाने यावर उपाययोजना करावी. पांडुरंग चौधरी, पीडित.