डिजिटल अरेस्टचे रॅकेट उद्ध्वस्तः सहा हजार सिमकार्ड जप्त, 112 खाती सील, 11 जणांना अटक; रायगड पोलिसांचे देशभरात छापे

रिटायर्ड अधिकारी, व्यापारी तसेच वृद्धांना ईडी, सीबीआयच्या धमक्या देत डिजिटल अरेस्ट करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या रायगड पोलिसांनी कंबरडे मोडले आहे. अलिबाग येथील वृद्धाला डिजिटल अरेस्ट करून 66 लाखांना लुटण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे युपी, आसाम, राजस्थान तसेच हैदराबादमध्ये धाडी टाकून 11 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी अभय संत, प्रकाश मिश्रा, मोहसीन खान तसेच अन्य सहा जण उत्तर प्रदेशातील आहेत. आरोपींकडून तब्बल 6 हजार 175 मोबाईल सिमकार्ड, 35 मोबाईल व अन्य साहित्य जप्त केले आहेत. तसेच आरोपींची 112 बँक खाती गोठविण्यात आली आहेत.

अलिबागच्या डिजिटल अरेस्ट प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ, पोलीस निरीक्षक अमोल मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय मोहिते यांच्या पथकाने तपास सुरू केला. या प्रकरणात आरोपींनी बनावट कॉल सेंटर कंपन्या स्थापन केल्याची माहिती प्राप्त झाली. हे रॅकेट नागरिकांना फोन करून डिजिटल अरेस्टची धमकी देऊन पैसे उकळत होती. याप्रकरणी 11 जणांना अटक केली असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली.

नेमकं काय आहे प्रकरण?
अलिबाग येथील वयोवृद्धाला 5 मे रोजी एका व्यक्तीने फोन करून तो टेलिकॉम अॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून बोलत असल्याचे सांगून वृद्ध इसमाला 9 नंबर डायल करण्यास सांगितले. त्यानंतर व्हिडीओ कॉल करून आपण सीबीआय अधिकारी असून तुम्ही मनी लॉण्डरिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले असून, तुम्हाला यातून बाहेर पडायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे धमकावले. यानंतर वेळोवेळी फोन करून आरोपींनी धमकावले आणि वृद्धाला 66 लाख वेगवेगळ्या बँक खात्यात भरण्यास सांगितले.

पाकिस्तान, कॅनडा, चीन कनेक्शन
विविध कंपन्यांसाठी डेटा सेंटर होस्ट करणाऱ्या कंपनीकडून डेटा स्पेस व डोमेन घेऊन आरोपींनी कॉल सेंटर तसेच इतर कंपन्या स्थापन केल्या होत्या. या एसआयपी लाईन कनेक्शनसाठी युपीचा इंजिनीअर असलेला अभय मिश्रा हा मुख्य भूमिका निभावत होता. या माध्यमातून तो पाकिस्तान, कॅनडा, नेपाळ, चीन, बांगलादेश येथील नागरिकांसोबत संपर्कात होता.

जिओ कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांनाही बेड्या
कंपन्या बनावट आहेत हे माहीत असूनही या कंपन्यांना एसआयपी लाईन देणाऱ्या जिओ कंपनीचे सेल्स मॅनेजर बलमोरी विनयकुमार राव व गंगाधर मुट्टन या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपींकडून तब्बल 6 हजार 175 सिमकार्ड जप्त केले आहेत. यामध्ये जिओ कंपनीचे 1 हजार 709, एअरटेल 2 हजार 334, व्हीआय 790, आयडिया 435, आंतरराष्ट्रीय 13 सिमकार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत.