
हिंदुस्थान आणि ब्रिटनदरम्यान मुक्त व्यापार करार (एफटीए) पूर्ण झाला आहे. या व्यापार कराराचा दोन्ही देशांना फायदा होईल, असा दावा केला जात आहे. मात्र याबाबत काही आर्थिक संशोधन संस्थांनी दिलेली आकडेवारी चकित करणारी आहे. ब्रिटनसोबतच्या मुक्त व्यापार करारामुळे हिंदुस्थानला पहिल्या वर्षी चार हजार कोटींपेक्षा जास्तीचे नुकसान होऊ शकते, असा दावा या संस्थांनी केलाय.
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हने सोमवारी याबाबतची अंदाज व्यक्त करताना सांगितले की, एफटीएमुळे हिंदुस्थानला पहिल्या वर्षी सीमा शुल्क महसुलीचे 4060 कोटी रुपयांचे नुकसान होईल. पुढील 10 वर्षांत हे नुकसान वाढू शकते. आर्थिक वर्ष 2024-25 मधील व्यापाराचे प्रमाण पाहता हिंदुस्थानचे वार्षिक नुकसान वाढून 6345 कोटी रुपये एवढे होऊ शकते.
अब्जावधींचे नुकसान
एफटीए करारानंतर हिंदुस्थानचे पहिल्या वर्षी अंदाजे महसूल नुकसान 4060 कोटी रुपये होईल. गेल्या वर्षी 2024-25 मध्ये ब्रिटनने हिंदुस्थानातून 14.5 अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तूंची आयात केली होती. त्यावर सरासरी आयात शुल्क 3.3 टक्के होता. आता व्यापार करारांतर्गत ब्रिटनने 99 टक्के हिंदुस्थानी वस्तूंवरील शुल्क हटवण्यावर सहमती दर्शवली आहे.
अहवालानुसार, एफटीएमुळे ब्रिटनला 47.4 कोटी डॉलर म्हणजे 3884 कोटी रुपयांचे नुकसान होईल, जे आर्थिक वर्ष 2024-25 च्या व्यापारी आकड्यावर आधारित असेल.