
उत्तर जिह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या भंडारदरा जलाशयाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती गठीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
भंडारदरा धरणास ‘आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय’ असे नाव देण्याचा निर्णय यापूर्वीच केला होता. धरणास यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. धरणाचे शंभरावे वर्ष या भागाच्या विकासात्मक दृष्टीने साजरे व्हावे, अशी संकल्पना जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी मांडून त्याची कार्यवाही सुरू केली आहे.
शताब्दी महोत्सव समिती स्थापन करून भंडारदरा जलाशयाचे संवर्धन आणि या भागातील पर्यटनाला संधी निर्माण करून देण्याच्या उपाययोजनांच्या सूचना आणि त्यादृष्टीने कराव्या लागणाऱया उपाययोजनांसाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून आढावा घेण्याकरिता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री विखे-पाटील, राज्याचे मुख्य सचिव, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
अकोलेच्या नैसर्गिक, भौगोलिक पार्श्वभूमीवर भंडारदराची निर्मिती झाली. धरणामुळे उत्तर अहिल्यानगरमधील अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यांतील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली. भंडारदराच्या पर्यटन विकासामुळे रोजगारनिर्मिती होणार आहे.