
रत्नागिरी तालुक्यात आज दोन वेगवेळ्या ठिकाणी एलपीजी गॅस टँकरचा अपघात झाल्याने रत्नागिरी पुन्हा गॅसवर आली. आज सकाळी 6 वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एलपीजी गॅस टँकरने रस्त्याशेजारी टपऱ्यांना उडवले. दुसरीकडे निवळी-गणपतीपुळे रस्त्यावर एलपीजी टँकर पलटी होऊन अपघात झाला आहे. सुदैवाने या दोन्ही अपघातांमध्ये गॅस गळती न झाल्याने पुढील अनर्थ टळला.
चार दिवसांपूर्वीच झालेल्या अपघातानंतर आज पुन्हा दोन गॅस टँकर पलटी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पहिल्या अपघातात एलपीजी गॅस भरून गोव्याकडे जाणाऱ्या टँकरवरचे चालकाचे नियंत्रण सुटून तो रस्त्याशेजारील टपऱ्यांना आणि दुचाकीवर आदळला. या अपघातानंतर हातखंबा येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून रस्त्यावरून एलपीजी गॅस टँकरच्या सतत होणाऱ्या अपघातामुळे आमच्या जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली.
दुसऱ्या अपघातात निवळी-गणपतीपुळे रस्त्यावर एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. सुदैवाने या टँकरमधून वायुगळती झालेली नाही. या घटनेनंतर हातखंबा परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी पाहणी केली.
गॅस टँकरना ताशी 20 किमीची वेगमर्यादा
एलपीजी गॅस टँकरचा ताफा सुरक्षित अंतरावर ठेवून टँकरचा वेग कमाल 20 किमी असावा. चालकाने दारू पिऊन गाडी चालवू नये अशा सक्त सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज गॅस पंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. चालकांना योग्य प्रशिक्षण द्यावे, चालकांची वैद्यकीय तपासणी करावी, गाडी चालवताना मोबाईल वापरू नये, चालकांना गणवेश द्यावा, चालकाला सहाय्यक असावा, चालकाची थकवा चाचणी घ्यावी. अशा सूचना गॅस पंपनीच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाला रस्त्यावर सुरक्षा चिन्ह, गतिरोधकाचा वापर, चालकांसाठी शिबिरे आयोजित करावीत अशा सूचना त्यांनी दिल्या.