कृषिमंत्री भरणे म्हणतात…वाकडं काम ही गावातील बोलीभाषा

राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पहिल्याच भाषणात, सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात. या वादग्रस्त वक्तव्याचा विरोधकांनी जोरदार समाचार घेतल्यानंतर भरणे यांनी ‘वाकडं काम’ हे गावातील बोलीभाषा आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना भरणे म्हणाले, मी जे ‘वाकडं काम सरळ’बाबत म्हटलं आहे त्यात माझं असं म्हणणं होतं की, अधिकारी आणि शेतकऱ्यांचं असं नातं असलं पाहिजे की, समोरचा माझ्या घरचा माणूस आहे. ‘वाकडं काम’ हे गावातील बोलीभाषा आहे. विनाकारण त्या वाक्याचा विपर्यास केला गेला. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी चुकणारा माणूस नाही, मी खूप समंजस माणूस आहे. मी असं वक्तव्य करणार नाही, असं यावेळी भरणे म्हणाले.

उद्या कृषिमंत्री पदाचा मी पदभार स्वीकारणार आहे. कर्जमाफीबद्दलच्या प्रश्नावर भरणे म्हणाले, कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. माहिती घेतल्याशिवाय मी काही बोलणार नाही. मी माहिती घेऊन आपल्याशी बोलेन.