महिला बांगलादेशी असली तरी मुलाचे संगोपन महत्त्वाचे; आरोपी महिलेची सुटका

नवी मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आरोपी महिलेने तुरुंगात बाळाला जन्म दिला असून तेथील परिस्थिती पाहता मुलाचे योग्य संगोपन होणे आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी आरोपी महिलेचा अटी, शर्तींवर जामीन मंजूर केला.

नवी मुंबई पोलिसांनी तुर्भे येथील बेंगाली पाडा येथे 8 मार्च रोजी मारलेल्या धाडीत बांगलादेशी महिलेला पकडले. त्यावेळी महिला गरोदर होती. न्यायालयीन कोठडीत असताना महिलेने एका बाळाला जन्म दिला. तुरुंगातील विदारक परिस्थिती बाळाच्या संगोपनासाठी अयोग्य असल्याने जामीन देण्यात यावा अशी विनंती करत महिलेने हायकोर्टात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने या जामीन अर्जाला विरोध केला तसेच अर्ज फेटाळून लावण्याची मागणी न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून या अर्जाकडे पाहत असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर जामीन मंजूर केला याचा अर्थ बांगलादेशी महिलेचे हिंदुस्थानमधील वास्तव्य कायम होत नाही असे नमूद करत न्यायालयाने 25 हजारांच्या जातमुचलक्यावर महिलेची सुटका केली.