
दहशतवाद्यांना ऑनलाइन ट्रेनिंग देणाऱ्या बदलापूरमधील डॉक्टरला एटीएसने अटक केली आहे. ओसामा शेख असे खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या या डॉक्टरला उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली. ओसामा याला न्यायालयात हजर केले असता त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले असून या डॉक्टरची कसून चौकशी करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशातील एका दहशतवादी प्रकरणात गुंतलेल्या आरोपींना त्याने ऑनलाइन ट्रेनिंग दिले असल्याची माहिती उघडकीस आली होती. उत्तर प्रदेश पोलीस दलाच्या दहशतवादविरोधी पथकाचे उपअधीक्षक सुशील सिंग यांच्या पथकाने बदलापूरमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा लावून ओसामाला अटक केली.
नागरिक, रुग्ण हादरले
या कारवाईमध्ये परिमंडळ-4च्या पोलीस उपायुक्तांनी मोलाची मदत केली. ओसामा याला उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपासासाठी त्याला उत्तर प्रदेशमध्ये नेण्यात आले आहे. बदलापूरच्या नवीन डीपी रस्त्यावरील खासगी रुग्णालयात कार्यरत असलेला डॉक्टर दहशतवाद्यांशी संपर्क ठेवून होता.