मैत्रीदिनाची पार्टी झाली पण पलक घरी परतलीच नाही..फ्रेंडशीप डेच्या दिवशीच मैत्रिणीचा अपघाती मृत्यू, मित्र जखमी

फ्रेंडशीप डेसाठी पवनकुमार याने त्याची मैत्रीण पलक हिला पार्टी देण्यासाठी घोडबंदर रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलवले. मैत्रीदिनाची जंगी पार्टी झाली. त्यानंतर तिला घरी सोडण्यासाठी पवनकुमार दुचाकीवरून निघाला. – पण मैत्रीदिनाच्या पार्टीसाठी गेलेली पलक घरी परतलीच नाही. मुंब्रा बायपासच्या रेतीबंदरजवळ एका भरधाव कंटेनरने पवनकुमारच्या दुचाकीला धडक दिली आणि पलक रस्त्यावर कोसळून जागीच ठार झाली. तर पवनकुमार हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

पवनकुमार मैसाला (24) हा पाचपाखाडी येथे राहतो. रविवारी फ्रेंडशीप डे असल्याने पवनकुमारने तीन हात नाका येथे राहणारी त्याची मैत्रीण पलक सोळंकी (21) हिला आणि तिची मुंब्रा येथील मैत्रीण झोया हिला तुळशीधाम येथील हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावले. फ्रेंडशीप डेची पार्टी झाल्यानंतर हे तिघेही पवनकुमारच्या दुचाकीवरून मुंब्र्यात गेले. तिथे त्यांनी झोया हिला सोडले. तिथून ठाण्यात परतताना मुंब्रा बायपास उड्डाणपुलापुढील रेतीबंदर नंबर 4 येथे पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला उडवले. या दुर्घटनेत पलक जागीच ठार झाली. तर पवनकुमार हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे तपास करत आहेत.