अमेरिकेकडून टॅरिफचा शस्त्रासारखा वापर, मात्र ब्रिक्स देशांचा आम्हाला भक्कम पाठिंबा; रशियाने ट्रम्प यांना सुनावले

अमेरिका टॅरिफचा शस्त्रासारखा वापर करत असून जागतिक आर्थव्यवस्थेसाठी ते धोकादायक आहे. तसेच अमेरिका त्यांच्या या धोरणामुळे जगात नववसाहतवाद विकसीत करत आहे, असा आरोपही रशियाने केला आहे. ट्रम्प यांच्याकडून टॅरिफ वाढीच्या धमक्या देण्यात येत आहेत. तसेच ट्रम्प यांनी अनेक देशांवर नवीन टॅरिफ जाहीर केला आहे. हिंदुस्थानवर ट्ररिफसह रशियाकडून तेल खरेदीप्रकरणी पेनल्टीही लावली आहे. यानंतर आता रशियाने ट्रम्प यांना चांगलेच सुनावले आहे.

ट्रम्प हे टॅरिफचा शस्त्रासारखा वापरक करत असून नववसाहतवाद विकसीत करत आहेत. मात्र, आम्हाला ब्रिक्स देशांचा भक्कम पाठिंबा आहे, असे रशियाने अमेरिकेला सुनावले आहे. रशियन तेल खरेदी करत असल्याने हिंदुस्थानवर टॅरिफमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा इशार ट्रम्प यांनी दिल्यानंतर आता रशियानेही अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प जगावर अमेरिकेचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी नववसाहतवादी धोरण अवलंबत आहेत. कोणत्याही प्रमाणात टॅरिफ वाढवले तरी ते जगातील व्यापाराची दिशा बदलू शकत नाहीत. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र मार्ग निवडणाऱ्या राष्ट्रांवर अमेरिका राजकीय आणि आर्थिक दबाव” टाकत आहे. अमेरिकेसाठीही हे घातक ठरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या अशाप्रकारचे निर्बंध आणि टॅरिफ खेदजनक वास्तव आहेत. अमेरिकेलाही जागतिक व्यवस्थेतील वर्चस्वासाठी मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. रशियाच्या भागीदारांविरुद्ध ट्रम्पच्या टॅरिफ धोरणावर भाष्य करताना झाखारोवा यांनी ते राष्ट्रांच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वावर थेट अतिक्रमण करत त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला. झाखारोवा यांनी ब्राझील, रशिया, हिंदुस्थान, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या ब्रिक्स देशांचा आम्हाला भक्कम पाठिंबा असल्याचेही सांगितले.

ट्रम्प यांना हिंदुस्थानचे प्रत्युत्तर
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की अमेरिका मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करण्यासाठी हिंदुस्थानच्या टॅरिफमध्ये मोठी वाढ करेल. हिंदुस्थानने यावर कठेर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर जेव्हा त्यांनी रशियाकडून आयात करण्यास सुरुवात केली तेव्हा अमेरिकेने अशा आयातीला सक्रियपणे प्रोत्साहन दिले. तसेच युरोपियन युनियनने भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांना त्यांच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीवरून वेगळे करण्याच्या भूमिकेलाही विरोध केला. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की हिंदुस्थानची आयात जागतिक बाजारपेठेच्या परिस्थितीमुळे असलेली गरज आहे. त्यावर टीका करणारे राष्ट्र स्वतः रशियाशी व्यापार करत आहेत, अशी आठवणही हिंदुस्थानने अमेरिकेला करून दिली आहे.