
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील पंचवीस गावांना पाण्याचा पुरवठा करणारा तसेच दोन हजार एकर शेतीसिंचन क्षेत्र अवलंबून असलेला मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच मुळा धरणाच्या उजवा व डावा कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्याबरोबर वर्षभरातील रब्बी हंगामातील पिकाचे पाणी नियोजन शेतकऱ्यांना करता येणार आहे. यंदा अपवादात्मक पावसाचे दिवस वगळता जून व जुलै महिना कोरडा गेल्याने या भागातील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र, घाटमाथ्यावर तसेच मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण तांत्रिकदृष्टय़ा भरत आल्याने मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत झाली आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाटबंधारे विभागाकडून मुळा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडून मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात आला. मुसळवाडी जलाशयाची जल साठवण क्षमता 189 दशलक्ष घनफूट आहे. जलाशयावर 25 गावांतील पिण्याचे पाणी योजना व दोन हजार एकर शेतीसिंचन क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मुसळवाडी तलाव मुळा धरणातील डाव्या कालव्याद्वारे व भंडारदरा धरणातील उजव्या कालव्याद्वारे दरवर्षी भरला जातो. पूर्वीच्या काळी मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तत्कालीन शासनाने भंडारदरा धरणातील 15 टक्के पाणी राखीव ठेवून दरवर्षी तलाव 189 दशलक्ष घनफूट क्षमतेने पाटबंधारे विभागामार्फत भरला जात होता.