
राधानगरी तालुक्यातील अकनूर परिसरातील काही गावांमधील शेतीत गवा, रानडुक्कर यांसारख्या जंगली प्राण्यांनी अक्षरशः धुडगूस घालत पिकांची मोठय़ा प्रमाणात नासधूस केली आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येऊन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी उभा ऊस गुंठा टन – दीडटन होत असतानाही गुंठा पाचशे ते सातशे रुपये दराने विक्री करत आहेत. अशा नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
काळम्मावाडी धरणाच्या डाव्या -उजव्या कालव्यामुळे नदीपासून डोंगरमाथ्यापर्यंत शेती सुजलाम सुफलाम बनली आहे. मुबलक पाण्यामुळे उसासारख्या आर्थिक खुळखुळणाऱया पिकांची मोठय़ा प्रमाणात लागवड सुरू झाली. परिणामी चारा-पाण्यासाठी जंगली प्राणी थेट शेतशिवारात मुक्त वावरू लागले. यामुळे डोंगरमाथ्याजवळ पण कालव्यावर असणाऱया केळी, उसासारखी उभी पिके फस्त होऊ लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून तर अकनूरसह मांगोली, नरतवडे, सुळंबी, सोळांकुर व कपिलेश्वर येथील शेतशिवारात ऐन पावसाळ्यातही जंगली प्राण्यांनी अक्षरशः धुडगूस घातल्याने उभी पिके उद्ध्वस्त होत असल्याने रोगराई जगू देईना आणि जंगली प्राणी पिके वर येऊ देईना, अशी गत झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
आठ ते दहा महिने शेतकऱ्यांनी कष्ट करून शेतीतून उसाचे पीक घेतले. मात्र, हातातोंडाशी आलेली उभी पिके मातीमोल होत असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. पावसाळ्यात जंगली प्राण्यांना डोंगरमाथ्यावर मुबलक चारापाणी असतानाही त्यांनी कालव्यालगतच्या पिकांकडे मोर्चा वळवल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे.
शेतकऱ्यांनी जंगली प्राण्यांना हुसकावण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांनाही जंगली प्राणी दाद देईनात. जंगली प्राण्यांनी नुकसान केल्यामुळे मशागत, लागण, खते, औषधे, इतर खर्च निघणार नसल्याने शेतकरी आतबट्टय़ात आला आहे. त्यामुळे अशा नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
डोंगर-शिवारात काही अल्पभूधारक व भूमिहीन शेतकरी काहींनी खंड व भागाने मोठय़ा कष्टाने शेती केली. त्यातून अधिकाधिक उत्पन्न मिळेल, अशी पिके तयार केली आहेत. पण गवे, रानडुकरे, माकडे यांचे प्रमाण वाढले आहे की, जंगली प्राण्यांचे कळपचे कळप येऊन पिकांमध्ये हैदोस घालून ऊस पिके उद्ध्वस्त करीत आहेत.
काही शेतकऱ्यांनी उभा ऊस गुंठा टन – दीडटन होत असतानाही गुंठा पाचशे ते सातशे रुपये दराने विक्री करत आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. हवामानाच फटका आणि आता रानडुकरे, गवे, माकडे, जंगली प्राणी या त्रासापासून शेतकरी मेटाकुटीला आल्याने शेती पडीक होण्याची भीती आणि शेतकरीवर्गावर उपासमारीची वेळ येते की काय अशी गत झाली आहे. त्यात शासनाची नुकसानभरपाई रक्कम म्हणजे शेतकऱ्यांचीच थट्टा होते.
– विजय पाटील, शेतकरी, अकनूर