
अॅपल कंपनीने हिंदुस्थानात गुंतवणूक करण्याऐवजी त्यांनी अमेरिकेत गुंतवणूक करावी, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर अखेर अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी आज ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना टिम कुक यांनी मोठी घोषणा केली. अॅपल कंपनी अमेरिकेत उत्पादन वाढवण्यासाठी 100 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास नऊ लाख कोटी रुपये अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे, अॅपलच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानला मोठा फटका बसणार आहे. याआधी अॅपलने 4 वर्षांत 500 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 44 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. म्हणजेच अॅपलची 50 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलने उत्पादने हिंदुस्थानात बनवू नये, असे म्हटले होते.
टिम कुक यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना एक महागडी भेटवस्तू गिफ्ट दिली आहे. ट्रम्प यांना दिलेली कस्टम-मेड भेट ही एक काचेची डिस्क आहे. ती 24 कॅरेट सोन्याच्या बेसवर बसवण्यात आली आहे. मध्यभागी अॅपलचा लोगो असून वर ट्रम्प यांचे नाव लिहिलेले आहे, तर खाली टिम कुक यांची स्वाक्षरी आहे. तसेच यावर ‘मेड इन यूएसए’ आणि वर्ष 2025 लिहिलेले आहे.