DPL 2025 – दिल्लीत पंजाबच्या वादळाचा तडाखा; 7 चौकार आणि 9 षटकारांची आतषबाजी, 52 चेंडूत ठोकलं शतक

पंजाब किंग्जचा विस्फोटक फलंदाज प्रियांश आर्यने दिल्लीमध्ये सुरू असलेल्या Delhi Premier League मध्ये गोलंदाजांची धुलाई केली आहे. चौफेर फटकेबाजी करत त्याने 52 चेंडूंमध्येच आपलं शतक पूर्ण केलं आहे. प्रियांश आर्यचा रुद्रावतार पाहून गोलंदाजांनाही चेंडू कुठे टाकावा, असा प्रश्न पडला असावा.

IPL 2025 मध्ये पंजबा किंग्ज कडून खेळताना प्रियांश आर्यने आपला जलवा दाखवून दिला होता. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका वाजवणाऱ्या गोलंदाजांना धुवून काढलं होतं. आता त्याची हीच ताबडतोब फलंदाजी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळतो. प्रियांश आर्य DPL मध्ये दिल्ली वॉरियर्स संघाकडून खेळत आहे. शुक्रवारी (8 जुलै 2025) खेळल्या गेलेल्या दिल्ली रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने सलामीला येत विस्फोटक अंदाजात फलंदाजीला सुरुवात केली. त्याने 56 चेंडूंचा सामना केला आणि 7 चौकार आणि 9 षटकारांचा चौफेर आतषबाजी करत 111 धावांची वादळी खेळी केली. इतर फलंदाजांचा सात न मिळाल्यामुळे त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु प्रियांश आर्यने आपला दमखम दाखवत पुन्हा एकदा आपल्या नावाची दखल घ्यायला सर्वांना भाग पाडलं.

दिल्ली रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्ली वॉरियर्स संघाने 20 षटकांमद्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात 231 धावा केल्या होत्या. दिल्ली वॉरियर्सने दिलेल्या 232 धावांच्या आव्हानाचा पाठलाग दिल्ली रायडर्स संघाने 19.5 षटकांमध्ये केला आणि सामनाही खिशात घातला. दिल्ली रायडर्सकडून कर्णधार अनुज रावत (84) आणि अर्पित राणा (79) यांनी दमदार खेळ केला.