ठाणे महापालिकेत मेगा भरती; लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय पदे भरणार

सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी आली आहे. ठाणे महानगरपालिकेत मेगा भरती सुरू झाली असून लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार असून एकूण 1 हजार 773 पदांकरिता आजपासून अर्ज मागवण्यात येणार आहेत.

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील गट – क व गट – ड मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी आज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमधील विविध पदांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहनदेखील प्रशासनाने केले आहे.

2 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

भरतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत आहे. परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र इत्यादी बाबी प्रवेशपत्रामध्ये देण्यात येणार आहेत. दरम्यान काही बदल असल्यास वेळोवेळी ठाणे पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.