
भाजप आणि निवडणूक आयोगाने केलेल्या मतांच्या चोरीमुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 70 जागांवर फटका बसला असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. तसेच भाजपला ज्या जागांवर विजय मिळाला आहे तो कितपत खरा आहे त्याचा तपासाही पक्षाकडून केला जाईल असेही राहुल गांधी म्हणाले.
इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला सुमारे 70 जागांवर 50 हजारांपेक्षा कमी मतांच्या फरकाने पराभव झाला असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षनेते के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबतच्या पक्षाच्या बैठकीत राहुल गांधी यांनी सांगितले की, भाजपने जिंकलेल्या मतदारसंघांतील विजय खरे आहेत का, हे पाहण्यासाठी पक्ष प्रयत्न करत आहे. त्यांनी मशीन-रीडेबल मतदार याद्यांचा वापर करण्याची बाजू मांडली, मात्र निवडणूक आयोगाने त्यासाठी परवानगी दिली नाही, असा दावा त्यांनी केल्याचेही सांगितले.