Ratnagiri News – स्मार्ट मीटर सक्ती विरोधात मंडणगड शिवसेना आक्रमक, जनआंदोलनाचा इशारा

मंडणगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीज ग्राहकांना कोणतीही पूर्व सुचना तसेच ग्राहकांची परवानगी न घेताच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून परस्पर वीज मीटर बदलण्याचे काम केले जात आहे. हे काम त्वरित थांबवावे आणि ज्या ज्या ग्राहकांचे विदयुत मीटर बदलण्यात आलेले आहेत, ते पुन्हा बसविण्यात यावेत अशाप्रकारची लेखी मागणी मंडणगड तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विदयुत महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली.

मंडणगड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता निलेश नानोटे यांची मंडणगड तालुका शिवसेना तालुका संघटक जितेंद्र दवंडे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन त्यांना स्मार्ट मीटर सक्ती विरोधात लेखी मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख रघुनाथ पोस्टूरे, उपतालुकाप्रमुख संदिप वाघे, शिवसेना मंडणगड शहरप्रमुख दशरथ सापटे, कलंदर मुगरुसकर, अमित चिले, प्रकाश महाडिक, अरविंद येलवे, भगवान जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेकडून म.रा.वि.वि.कंपनीच्या मंडणगड येथील कार्यकारी अभियंता निलेश नानोटे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वीज ग्राहकांची परवानगी न घेताच विद्युत मीटर सक्तीने बसविले जात असून याबाबत अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. सक्तीने विदयुत मीटर बसविण्यात येऊ नयेत अशाप्रकारची तोंडी चर्चा आपल्याकडे याआधी प्रत्यक्ष भेटीत झालेली होतीच, तरीसुद्धा तालुक्यातील बहुसंख्य नागरीक हे कामानिमित्त शहरी भागात असून अनेकांची घरे बंद असताना आपणाकडून हेतू परस्पर कोणतीही ग्राहकाला माहिती अथवा सुचना न देताच वीज मीटर बदलले जात आहेत. तर अनेकांच्या घरी अशिक्षित वृध्द महिला व नागरीक राहत असून त्यांना थातूरमातूर कारण देत वीज मीटर बदलण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यात या सगळ्या प्रकाराला तीव्र विरोध असताना आपल्याकडे तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या अशिक्षितपणाचा व कोणीही घरी नसल्याचा गैरफायदा घेत मीटर बदलले जात आहेत. ही बाब चिड आणणारी तर आहेच शिवाय ग्राहकांच्या हक्कावर गदा आणणारी आहे. याची अधिकारी म्हणून तुम्ही माहिती घेवून, जे विद्युत मीटर बदलण्यात आलेले आहेत ते पूर्वीप्रमाणे बसविण्यात यावेत. गणेशोत्सवापूर्वी हे मीटर पुर्ववत बसवण्यात आले नाहीत तर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने या घटनेविरोधात तीव्र जनआंदोलन करण्यात येईल व त्या आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास त्या सर्वांची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी. अशाप्रकारचा विदयुत महावितरणाला इशाराच देण्यात आला आहे.