
रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकून पुन्हा एकदा हिंदुस्थानींना जल्लोष करण्याची संधी दिली. न्यूझीलंडविरुद्धचा तो अंतिम सामना, तो क्षण, जल्लोष आणि त्या आठवणी आजही ताज्या आहेत. शुक्रवारी 79व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने यष्टिरक्षक ऋषभ पंतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत या आठवणींना उजाळा दिला. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्माची मिश्किल टिप्पणी चाहत्यांचे लक्ष वेधून गेली. ‘प्रत्येक वेळी कप जिंकल्यावर निवृत्त होणार काय’, असे रोहित ऋषभला सांगत असल्याचे पाहायला मिळतेय.
चॅम्पियन्स झाल्यानंतर हिंदुस्थानचे खेळाडू आनंद साजरा करत असल्याची एक दुर्मिळ व्हिडीओ पंतने शेअर केला आहे, ज्यामध्ये पंतने रोहितला स्टम्प घेऊन कुठे जातोय असे विचारले असता, हिटमॅनने त्याची फिरकी घेतली. ‘काय? निवृत्ती घेऊ? प्रत्येक वेळी कप जिंकल्यावर निवृत्त होणार काय’, असे उत्तर रोहितने पंतला दिले.