
जर्मनीने युरो हॉकी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवताच आगामी एफआयएच हॉकी वर्ल्ड कपसाठी (बेल्जियम व नेदरलॅण्ड्स – 2026) आपली पात्रताही निश्चित केली आहे. आता अंतिम फेरीत त्यांची गाठ नेदरलॅण्ड्सशी पडणार असून यजमान देश म्हणून नेदरलॅण्ड्सने याआधीच आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे युरोपकडून जर्मनीला थेट पात्रता मिळाली.
जर्मनीने युरो हॉकी मोहिमेला फ्रान्सविरुद्धच्या रोमहर्षक सामन्याने सुरुवात केली. अखेरच्या दहा मिनिटांपर्यंत फ्रान्स 2-0 ने आघाडीवर होता. मात्र जस्टस विगँडचे दोन आणि गोंझालो पेलियाटच्या एक गोल यांच्या जोरावर यजमानांनी शानदार पुनरागमन करत तीन गुणांची कमाई केली. इंग्लंडविरुद्धचा सामना 1-1 असा अनिर्णीत राहिला होता. ज्यामुळे जर्मनी गटात मजबूत स्थितीत पोहोचला.
शेवटच्या गट सामन्यात पोलंडचा 10-0 असा धुव्वा उडवत होनामासने उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत त्यांचा सामना स्पेनशी झाला. अवघ्या महिनाभरापूर्वी एफआयएच हॉकी प्रो लीगच्या अखेरच्या दोन सामन्यांत स्पेनने जर्मनीला विजयापासून वंचित ठेवत पात्रता मिळवली होती, मात्र यावेळी जर्मनीने ‘रेड स्टिक्स’वर मात केली.
सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन गोल करीत आघाडी घेतलेल्या जर्मनीने दुसऱ्या सत्रात एक गोल गमावला आणि मध्यंतराला स्कोअर 2-1 झाला. शेवटच्या सत्रात आणखी दोन गोल करीत जर्मनीने स्पेनच्या पुनरागमनाची शक्यता संपुष्टात आणली.
जर्मनी हा 2026 च्या एफआयएच हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरलेला सहावा पुरुष संघ ठरला आहे. यजमान म्हणून बेल्जियम व नेदरलॅण्ड्स तर ऑस्ट्रेलिया व स्पेनने प्रो लीगमधून पात्रता मिळवली. अर्जेंटिनाने पॅन अमेरिकन कप जिंकून आपले स्थान निश्चित केले. आगामी काही महिन्यांत आशिया, आफ्रिका व ओशिनियातील खंडीय स्पर्धांमधून आणखी तीन संघ थेट पात्र ठरतील. उर्वरित सात संघांची निवड 2026 च्या विश्वचषक पात्रता स्पर्धेतून होईल.