Nanded Rain News – जिल्ह्यातील 27 महसूल मंडळात अतिवृष्टी, इसापूर धरणाचे 9 दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर शुक्रवारी (15 ऑगस्ट 2025) सायंकाळी व शनिवारी (16 ऑगस्ट 2026) दिवसभर जिल्ह्याच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे. जिल्ह्यातील 27 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कंधार तालुक्यातील फुलवळ या मंडळात (133.25 मि.मी.) झाला आहे. इसापूर धरणाचे नऊ दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आल्याने हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट या नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच दरम्यान, कंधार तालुक्यात कोटबाजार येथे भिंत कोसळून एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. विष्णूपुरी प्रकल्प काठोकाठ भरला असून, या प्रकल्पाचे दोन दरवाजे शनिवारी सकाळी उघडण्यात आल्याने जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्राच्या सकल भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेड शहर जिल्ह्याला पावसाने झोडपल्याने सबंध जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील मुखेड, जांब, चांडोळा, कंधार, कुरुळा, फुलवळ, उस्माननगर, दिग्रस, माळाकोळी, लोहा, कलंबर, भोकर, आष्टी, मोघाळी, मातूळ, देगलूर, खानापूर, नरंगल, मुगट, उमरी, सिंधी, धानोरा, बरबडा, कुंटूर, नायगाव, मांजरम या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस उमरी तालुक्यात 83.70 मि.मी. तर सर्वात कमी पाऊस किनवट तालुक्यात 5.60 मि.मी. एवढा नोंदला गेला आहे. 24 तासात जिल्ह्यात सरासरी 46.30 मि.मी.पाऊस झाला आहे. इसापूर धरण पूर्णतः भरले असून, धरण पातळी नियंत्रित करण्यासाठी 16 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता सात गेट 50 सेंटीमीटरने उघडण्यात आल्याने जिल्ह्यातील किनवट, हदगाव, हिमायतनगर, माहूर या तालुक्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर विष्णूपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने नांदेड, मुदखेड, धर्माबाद, नायगाव आदी तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आसना नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आला असून, सांगवी आणि मालेगाव येथे पुलावर पाणीपातळी वरचेवर वाढत आहे. अर्धापूर, मालेगाव, लिंबगाव परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. कंधार-गत दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घराची पाठभिंत कोसळून पती-पत्नीचा चिरडून मृत्यू झाला आहे. घरकुल मंजूर असतानाही प्रशासनाच्या अनाठायी नियमानुसार पहिला हप्ता न मिळाल्याने शेख नासीर (६५) व शेख हसीना (६०) यांना आपला जिव गमावला. ह्या ह्रदयदायी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.