
मुंबई, ठाणे, नवी मुंबई सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. थरावर थर लावण्यासाठी गोविंदांची लगबग सुरू आहे. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. कोकण नगर गोविंद पथकासह जय जवान गोविंद पथकाने 10 थर लावत विश्वविक्रम केला. मात्र दुसरीकडे मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तसेच अनेक गोविंदा जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दमध्ये दहीहंडीचा रोप बांधताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथे ही दुर्घटना घडली आहे. बाल गोविंदा पथकातील 32 वर्षी गोविंदा जगमोहन शिवकुमार चौधरी दहीहंडी रोप बांधण्यासाठी वर चढला असताना तोल गेल्याने तो खाली पडला. त्याला तात्काळ जखमी अवस्थेत गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांपूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुंबईतील दहीहंडी उत्सवामध्ये आतापर्यंत 30 गोविंदा जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे.