बेबी AB चा झंझावात, ऑस्ट्रेलियाला चोपून काढलं; कांगारुंविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिक यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा टी-20 सामना केर्न्सच्या कॅझालिस मैदानावर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांमध्ये 172 धावा केल्या. या सामन्यात बेबी AB म्हणून प्रसिद्ध असणारा डेवाल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. त्याने 26 चेंडूंमध्ये एक चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने ताबडतोब 53 धावांची खेळी केली आणि एक विक्रम सुद्धा आपल्या नावावर केला आहे.

डेवाल्ड ब्रेव्हिसची बॅट या मालिकेत चांगलीच तळपली आहे. त्याने मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही 56 चेंडूंमध्ये 125 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याची हीच धमाकेदार फलंदाजी तिसऱ्या टी-20 सामन्यातही पाहायला मिळाली. त्याने 26 चेंडूंचा सामना केला आमि 1 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 53 धावांची वादळी खेळी केली. तसेच त्याने 10 व्या षटकामध्ये आरोन हार्डीच्या गोलंदाजीवर सलग चार चेंडूंमध्ये चार षटकार ठोकले आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं. याच सलग चार षटकारांच्या जोरावर डेवाल्ड ब्रेव्हिसने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. डेवाल्ड ब्रेव्हिस आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग चार चेंडूंमध्ये चार षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 चेंडूंमध्ये वेगावन अर्धशतक करणारा डेवाल्ड ब्रेव्हिस पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचा माजी खेळाडू रवी बोपाराच्या नावावर होता. त्याने होबार्टच्या मैदानावर 2014 साली ऑस्ट्रेलिविरुद्ध 23 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.