
हिंदुस्थानच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनीही देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पटकथाकार, कवी जावेद अख्तर यांनी ‘एक्स’ पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. त्यावर एका युजरने तुमचा स्वातंत्र्यदिन तर 14 ऑगस्ट आहे, असे म्हणत त्यांचा संबंध पाकिस्तानशी जोडला. यावर जावेद अख्तर यांनी ‘बेटा, तुझे पूर्वज इंग्रजांचे बूट चाटत होते,’ असे सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सला खडसावले.
‘गोलमाल’ नावाने ‘एक्स’वर अकाऊंट असणाऱ्या एका ट्रोलर्सने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यावरून जावेद अख्तर यांना ट्रोल केले. यावर संतापलेल्या जावेद अख्तर यांनी ‘एक्स’ पोस्ट करत त्या ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला. ‘बेटा, तुझे वडील-आजोबा इंग्रजांचे बूट चाटत होते तेव्हा माझे पूर्वज देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळय़ा पाण्याची शिक्षा भोगत मरत होते. आपल्या लायकीत रहा,’ असे खडेबोल जावेद अख्तर यांनी सुनावले आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छांची अशी होती पोस्ट…
‘माझ्या सर्व भारतीय भगिनी आणि बंधूंना स्वतंत्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण हे विसरता कामा नये की, हे स्वातंत्र्य आपल्याला ताटात वाढले गेले नाही. आज आपण त्या लोकांना आठवले पाहिजे आणि त्यांना नमन केले पाहिजे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुरुंगात गेले आणि फासावर गेले. ही मौल्यवान भेट आपण कधीही गमावणार नाहीत याची काळजी घेऊया,’ अशी पोस्ट जावेद अख्तर यांनी स्वातंत्र्यदिनी केली होती.