मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू; 116 जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक  

Photo - Ganesh Wadkar

मुंबईत सर्वत्र दहीहंडी निमित्त उत्साहाचे वातावरण असतानाच गोविंदाचा मृत्यू आणि जखमी गोविंदामुळे या उत्सवाला गालबोट लागले.  उत्साहाच्या भरात हंडी फोडताना 116 गोविंदा पडून जखमी झाले तर एका गोविंदाचा दहीहंडीची दोरी बांधताना घरावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. जगमोहन चौधरी (32) असे त्या मृत गोविंदाचे नाव आहे. दरम्यान जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईत दरवर्षी मोठया उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. दादर, घाटकोपर, वरळी, लालबाग, परळ, गिरगाव, अंधेरी, बोरिवली, दहिसर, भायखळा, भांडूप, विक्रोळी, मुलुंड, कुर्ला आदी विभागात दहीहंडी फोडायला गोविंदाची एकच गर्दी जमते सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असतानाच शहरात विविध ठिकाणी गोविंदा पडून जखमी झाले. पालिकेच्या माहितीनुसार 116 जखमी गोविंदांपैकी 43 जखमी गोविंदांवर विविध रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित 32 जखमी गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील श्रेयस चाळके व आर्यन यादव (9) हे दोघे गोविंदा जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. श्रेयस याच्यावर जी. टी. रुग्णालयात तर आर्यनवर कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तोल गेला आणि होत्याचे नव्हते झाले

मानखुर्दच्या, महाराष्ट्र नगर येथे बाळ गोविंदा पथकातील गोविंदा जगमोहन चौधरी (32) हा एक मजली घरावर लोखंडी ग्रीलला दहीहंडीची दोरी बांधण्यासाठी चढला. दोरी बांधत असतानाच त्याचा तोल गेला व तो घरावरून खाली पडला. गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.