मिनिस्ट्री कोट्यातून एमबीबीएसला नंबर मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, दोघा भामट्यांना पकडून 14 लाख 70 हजारांची रक्कम हस्तगत

आमची मंत्री, अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख आहे. तुमच्या मुलीला मिनिस्ट्री कोट्यातून एमबीबीएसला सहज नंबर लावून देऊ, अशी बतावणी करत दोघा भामटय़ांनी एका 43 वर्षीय व्यक्तीची 14 लाख 40 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. पण याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आझाद मैदान पोलिसांनी तपास करत दोघा आरोपींना पकडून गुह्यातील सर्व रक्कम हस्तगत केली.

दक्षिण मुंबईतील धोबी तलाव परिसरात राहणारा सुरेश (नाव बदललेले) याला त्यांच्या मुलीकरिता एमबीबीएसला अॅडमिशन घ्यायचे होते. याकरिता सुरेश प्रयत्नशील होता. ही बाब त्याचा दूरचा नातेवाईक एनुल झेनुल हसन (32) याला मिळाली. मग एनुल याने कृष्ण मोहन शर्मा (46) याच्या मदतीने सुरेशला विश्वासात घेतले. आमची मोठय़ा लोकांसोबत ओळख आहे. तुझ्या मुलीला मिनिस्ट्री कोट्यातून एमबीबीएसला नंबर लावून देऊ, अशी बतावणी केली. दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत सुरेशने त्यांना 14 लाख 70 हजार रुपये देऊ केले. मे 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत हा व्यवहार झाला. परंतु पैसे मिळाल्यानंतर दोघांनी सुरेशला थातूरमातूर उत्तरे देऊन टाळाटाळ सुरू केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरेशने आझाद मैदान पोलीस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून सपोनि लिलाधर पाटील, तसेच राजेंद्र कटरे, सचिन पाटील, अमरदीप कीर्तकर, गोपी पाटील, ज्ञानेश्वर मुंढे या पथकाने तपास करून आधी मूळचा दिल्लीचा असलेल्या कृष्ण मोहन याला पुण्यातून उचलले. मग एनुल याला त्याच्या यूपीतल्या गावातून पकडण्यात आले. दोघांकडून फसवणूक केलेले 14 लाख 70 हजार रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश मिळाले.