राजकारणात प्रेसिडंट ट्रम्प नंतर देवेंद्र फडणवीस सर्वात मोठे जोकर, संजय राऊत यांची टीका

गौतम अदानीच्या हंडीमधली मलई खाणारे हेच लोक आहेत अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. तसेच राजकारणात प्रेसिडंट ट्रम्प नंतर देवेंद्र फडणवीस सर्वात मोठे जोकर आहेत असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबई आणि ठाणे लुटणारे त्यांच्या सरकारमध्ये आहेत. मुंबई महानगरमधल्या 90 हजार कोटी रुपयांच्या ठेवी या आमच्या काळात ठेवल्या गेल्या. ते काय मुंबई लुटल्यामुळे? या 90 हजार कोटी रुपयांची लूट तुम्ही केली? मधल्या काळात नगरविकास खात्यांच्या मंत्र्यांनी दोन लाख कोटी रुपयांची कामं दिली. तिजोरीत पैसे नाहीत, कुणाला कामं दिली याचा पत्ता नाही. पण दोन लाख कोटींवरचं 25 टक्के कमिशन त्यांच्याकडे पोहोचलं आहे त्यात फडणवीसांची लोकंही आहेत. महानगरपालिका कुणी लुटली हे मुंबईच्या जनतेला माहित आहे. ज्यांनी मुंबई लुटली त्यांच्याच हंड्या आपण फोडतोय. हंडीमध्ये दही लोणी जे आहे, ते ज्यांनी ओरपून खाल्लं आहे त्यांच्या हंड्या आपण फोडतोय याला काय म्हणायचं. देवेंद्र फडणवीस तुमच्या आजूबाजुला जे चोर लफंगे आहेत त्यांना पाठीशी घालू नका. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. हे गौतम अदानीची हंडी फोडणारे लोक आहेत. गौतम अदानीच्या हंडीमध्ये जी मलई आहे, ते खाणारे हेच लोक आहेत हे आम्हाला काय सांगत आहेत. धारावीसह मुंबईतले अनेक भुखंड ज्या लोकांनी अदानीच्या घशात घातले, ते देवेंद्र फडणवीस आमच्यावर टीका करत आहेत आणि आरोप करत आहेत हा सर्वात मोठा विनोद आहे. प्रेसिडंट ट्रम्प नंतर राजकारणात सर्वात मोठे जोकर असतील ते देवेंद्र फडणवीस झालेले आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हे सगळे दहीहंडी वीर आहेत. त्यांच्या हातातली मुरली वाजवत ते फिरतात. नारायण राणे यांच दुकान आतापर्यंत तीनवेळा बंद झालं आहे. ते काँग्रेसमध्ये असताना त्यांचं दुकान बंद झालं. आता भाजपमध्ये ते मेहेरबानीवर जगत आहेत. जसे वृद्धाश्रमामध्ये एखाद्याला टाकून जगवतात, तसं ते कृत्रिम ऑक्सिजनवर जगत आहेत. त्यांनी आमची दुकानं बंद करण्याबद्दल बोलू नये. 2029 च्या निवडणुकीत कोकणात कुणाचं दुकान बंद होत आहे, हे आपल्याला कळेल. नारायण राणे यांनी आपल्या वयाचं भान ठेवावं. आता त्यांनी जुनी भाषा वापरू नये. शिवसेने त्यांना ही भाषा शोभत होती, आता ही भाषा त्यांना शोभत नाही लोकं हसतात अशी टीका संजय राऊत यांनी केली.