
गेल्या आठ तासांत मुंबईत 177 मिमी पाऊस पडला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच महत्त्वाचे काम असल्याच बाहेर पडावे असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पुढील तीन दिवस, म्हणजेच 21 ऑगस्टपर्यंत, राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट लागू आहे.
तसेच घ्यावयाच्या खबरदारीविषयी आम्ही चर्चा केली आहे. आमच्या नियंत्रण कक्षातून जिल्ह्यांतील केंद्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुठेही नुकसान झाले असल्यास मदत पुरवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पुढील काही दिवसांत संभाव्य आपत्ती कमी करण्यासाठीही पावले उचलली जात आहेत. शेजारील राज्यांशी मग ते तेलंगणा असो किंवा कर्नाटक, पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीने होण्यासाठी चर्चा सुरू आहे. विशेषतः कोकणात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती उद्भवू नये, याची काळजी घेतली जात आहे.
शेतकऱ्यांनी सुमारे 4 लाख हेक्टर जमिनीवर पिके घेतली होती. त्यांना नुकसान झाले आहे. याचे मूल्यमापन करून मदत केली जाणार आहे. नांदेडमधील मुक्करामाबाद येथे काल 206 मिमी पावसाची नोंद झाली. काल तिथे ढगफुटीची परिस्थिती निर्माण झाली होती, लोक अडकले होते. आतापर्यंत 206 लोकांना वाचविण्यात आले असून अधिक लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफ आणि लष्कराच्या टीम तिथे कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतही जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या 8 तासांत मुंबईत 177 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुढील 8-10 तासांत मुंबईसाठी रेड अलर्ट आहे. त्यामुळे दुपारनंतर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. फक्त अत्यावश्यक काम असल्यासच लोकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत पुढील 2-3 दिवस पावसाची शक्यता आहे. भरतीही येणार आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अलीकडील पावसामुळे 14 ठिकाणी पाणी साचले होते. मात्र 12 ठिकाणी वाहतूक सुरू आहे. मुंबईची रेल्वे सेवा उशिरा चालली असली तरी ती पूर्णपणे थांबलेली नाही असेही फडणवीस यांनी नमूद केले.
#WATCH | Mumbai: Maharashtra CM Devendra Fadnavis says, “In the last 2 days, Maharashtra has received widespread rainfall. Red Alert and Orange Alert have been issued for several districts. Even for the next three days, until 21st August, half of the districts in Maharashtra have… pic.twitter.com/GXvvleVAYP
— ANI (@ANI) August 18, 2025