Ratnagiri Rain News – जिल्ह्यात पावसाचे धूमशान, मुर्शीत दरड कोसळल्याने आंबा घाटात एकेरी वाहतूक

गेले चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे खेड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. दापोली-खेड रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. खेड-भरणे रस्ता जलमय झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मिऱ्या-नागपूर महामार्गावर आंबा घाटात मुर्शी जवळ दरड कोसळली. दरड बाजूला करून सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीने पातळी गाठली आहे. राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाची ‘सेंच्युरी’ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. नऊही तालुक्यात 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 134.14 मिमी पाऊस पडला आहे. त्यामध्ये मंडणगड -124.00 मिमी, खेड – 170.00 मिमी, दापोली – 154.00 मिमी, चिपळूण – 147.11 मिमी, गुहागर – 113.00 मिमी, संगमेश्वर – 163.33 मिमी, रत्नागिरी – 119.55 मिमी, लांजा – 116.66 मिमी आणि राजापूर – 99.62 मिमी पाऊस पडला आहे.
फोटो