
तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मराठवाडय़ाची दाणादाण उडाली आहे. गेल्या 72 तासांपासून मांजरा, तेरणा, येलदरी, सिद्धेश्वर, लोअर दुधना, शिवना टाकळी, इसापूर, विष्णुपुरी धरणाचे दरवाजे सताड उघडे असल्यामुळे नदीकाठ महापुराच्या सावटाखाली आला आहे. पावसामुळे मराठवाडय़ात सहा जणांचा बळी गेला असून शेकडो जनावरे वाहून गेली. लातूर जिल्हय़ात दोन गावांना पुराचा वेढा पडला असून सहा मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. परळीत पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. कारमधील तिघांना वाचवण्यात यश आले असून एक जण मात्र बेपत्ता झाला. हिंगोलीत पैनगंगा कोपल्याने मराठावाडा-विदर्भाचा संपर्क तुटला आहे.
आदिनाथ मंदिरात पावसाचे पाणी
औंढा नागनाथ येथील आदिनाथ मंदिरात पावसाचे पाणी शिरल्याने शिवलिंग बुडाले. मंदिरात कमरेएवढे पाणी साचले.