
सुट्टी संपवून पुन्हा ड्युटीवर परतण्यासाठी निघालेला लष्कराचा जवान आणि त्याच्या भावाला टोल कर्मचाऱ्यांकडून कथितरीत्या खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना मेरठमधील टोलवर घडली. त्यामुळे आसपासच्या गावांतील संतापलेल्या जवळपास 500 हून अधिक लोकांनी टोल प्लाझाची तोडपह्ड केली तसेच दगडफेक केली. या घटनेप्रकरणी सहा टोल कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. कपिल कवाड असे या जवानाचे नाव आहे. कपिलला विमान पकडण्यासाठी उशीर होत होता. त्यावेळी त्याने रांगेतून बाहेर येऊन पुढे जाण्याची परवानगी टोल कर्मचाऱ्यांकडे मागितली. त्यावरून बाचाबाची झाली.
टोल प्लाझा एजन्सीला 20 लाखांचा दंड
एनएचएआयने लष्कराच्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी भुनी टोल प्लाझा एजन्सीला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. संबंधित एजन्सीला पुढील निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यापासून बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचेही एनएचएआयने स्पष्ट केले.