
सोमवारी पहाटे मुखेड तालुक्यावर आभाळातून अजस्त्र जलधारा कोसळल्या! ढगफुटीचा ताण नुकतीच घळभरणी झालेल्या लेंडी धरणाला सहन झाला नाही. त्यामुळे रात्रीतून लेंडी नदीचे पाणी 18 फूट एवढे अक्राळविक्राळ वाढले आणि अवघ्या काही तासात हसनाळसह सहा गावांना महापुराची मगरमिठी पडली. केंद्री, लेंडी, तेरू नद्यांनी रौद्ररूप धारण केले. रात्रीच्या काळोखात पुराचे पाणी घरांमध्ये घुसल्याने एकच दाणादाण उडाली. सहा गावातील लोकांनी जिवाच्या भीतीने रात्र जागवून काढली. सकाळ होताच एसडीआरएफ, एनडीआरएफचे पथक मदतीसाठी दाखल झाले. तोपर्यंत गावकऱ्यांनी गाव सोडून सुरक्षित स्थळी आश्रय घेतला होता. उर्वरित लोकांना लष्कराच्या जवानांनी बोटीतून सुरक्षित स्थळी पोहोचवले. हसनाळ गावातील पाच जण बेपत्ता आहेत. महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या भिंगोली, भेंडेगाव, रावणगाव, भासवाडी, सांगवीचा संपर्क तुटला आहे.
गावागावातून मदतीसाठी आरोळय़ा
मुसळधार पावसामुळे अनेक गावांतील वीज पुरवठा खंडित झाला. सखल भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यामुळे ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. हसनाळ गावातील तरुणांनी वृद्ध, महिला, लहान मुलांना मुसळधार पावसात सुरक्षित स्थळी पोहोचवले. एका गावात 15 ते 16 जण अजूनही मशिदीच्या छतावर अडकलेले आहेत. हसनाळ येथील पिराजी थोतवे (75), चंद्रकला शिंदे (42), ललिताबाई भोसले (50), भीमाबाई मादाळे (60), गंगाबाई मादाळे (65) हे बेपत्ता असून तिघांचा सायंकाळी उशिरा मृतदेह सापडल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.