शिरपूरमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण, जमावाचा पोलीस अधिकाऱ्यावर चाकू हल्ला

shirpur-tribal-march-turns-violent-mob-attacks-police-officer-with-knife

शिरपूरमधील दहिवद येथे आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काढलेल्या आदिवासींच्या मूक मोर्चाला आज हिंसक वळण लागले. मोर्चातील एक गट गुजराती कॉम्प्लेक्स येथे रस्ता अडवून धुडगूस घालत होता. जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. त्यावेळी गोंधळाचा फायदा घेत संशयिताने सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पाठीवर चाकूने वार केला. याप्रकरणी हल्लेखोर जगन सतीश भिल याच्यासह काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरातील चोपडा जीन येथून सकाळी साडेदहाला मोर्चास सुरुवात झाली. मेन रोडने मोर्चा न्यायालय परिसर व तेथून डीवायएसपी कार्यालयाच्या प्रांगणात नेण्यात आला. तेथे मोर्चेकऱयांनी ठिय्या दिला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे, माजी नगराध्यक्षा संगीता देवरे, पंचायत समितीच्या माजी उपसभापती कल्पना कोळी आदींच्या उपस्थितीत प्रांताधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, डीवायएसपी सुनील गोसावी यांना निवेदन दिले. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात सर्वपक्षीयांतर्फे निवेदने देण्यात आली.

मोर्चा शांततेत पार पडला, परंतु त्यानंतर अर्ध्या तासानंतर काही समाजपंटकांनी नागरिकांनी त्रास होईल असे वर्तन सुरू केले. तसेच आरोपींना जागेवर फाशीच देण्याची मागणी केली. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने आम्ही त्यांना समजवत असताना एका समाजपंटकाने धारदार शस्त्र्ााने हल्ला केला. या हल्ल्यात मला किरकोळ जखम झाली. येथे शांतता असून अफवांना बळी पडू नका.

– जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक