
वेसावा कोळीवाड्याचा सर्वात प्रतिष्ठेचा आणि थरारक असा दहीहंडी उत्सव यंदा साजरा झाला. विशेष म्हणजे सव्वाशे वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या भाल्याने हंडी फोडण्याच्या अद्वितीय परंपरा पाहायला मिळाली. यंदा डोंगरीकर तरुण मंडळाला हंडी फोडण्याचा मान मिळाला.
वेसावा कोळी जमातीच्या पंचायतन परंपरेनुसार, सामायिक दहीहंडीचा मान प्रत्येक गल्लीला नऊ वर्षांनी मिळतो. यंदा हा मान डोंगरीकर तरुण मंडळाकडे गेला होता. हा उत्सव वेसाव्याचा अभिमान आणि कोळी संस्कृतीचा वारसा मानला जातो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराची महाआरती करून या उत्सवाला सुरुवात झाली. यानिमित्त हरिनाम सप्ताह ते कृष्णजन्मोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नारळी पौर्णिमेनंतर श्रीराम मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू झाला.
शुक्रवारी कृष्ण जन्मोत्सवाची महायात्रा संपूर्ण गावातून काढली होती. हजारो भाविक निरनिराळय़ा वाद्यवृंदांसह हरिनामाचा जप करत मिरवणुकीत सहभागी झाले. दुसऱया दिवशी सकाळी भाल्याची मिरवणूक काढून मानाची दहीहंडी फोडली. हंडी फोडण्याचा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत चिखले, सचिव जितेंद्र चिंचय, सहसचिव पंकज कोळी, खजिनदार केदार चिंचय यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना मिळाला.