
नवी मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले असताना नवी मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र आज जनता दरबारात ड्युटी केली. वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. या दरबारात महापालिकेचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. वास्तविक या आणीबाणीच्या परिस्थितीत अधिकाऱ्यांनी फिल्डवर राहणे आवश्यक होते. मात्र जनतेला वाऱ्यावर सोडून अधिकारी जनता दरबारात रमल्याने सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
गेल्या चार दिवसांपासून नवी मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबत असून त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. परिणामी शहरातील सर्व शाळांना आज महापालिका प्रशासनाने सुट्टी दिली. नागरिकांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे, असे आवाहनही नागरिकांना दिले. याच परिस्थितीत वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. या दरबारासाठी महापालिकेचे अनेक विभागप्रमुख सकाळपासून संध्याकाळपर्यंत भावे नाट्यगृहात ठाण मांडून बसले होते. वास्तविक या परिस्थितीमध्ये पालिका अधिकाऱ्यांनी शहराच्या संवेदनशील भागावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असताना त्यांनी थेट जनता दरबारात हजेरी लावल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.
नवी मुंबई शहरात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरात गेल्या दोन दिवसांत 300 मिलीमीटर पाऊस पडला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार सुरू झाल्यानंतर दोन तासांत शहरात 50 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.
पोलीस, सिडकोचे अधिकारीही वेठीला
नवी मुंबईसह संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने नदी-नाले एक झाले आहेत. शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. झोपडपट्टी भागात पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच परिस्थितीत जनता दरबारामुळे फक्त पालिकेचे अधिकारी नाही तर पोलीस आणि सिडकोचे अधिकारीही वेठीला धरले गेले. नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आज दिवसभर जनता दरबाराच्या सेवेत होते.