
लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत. असे असताना मिठाईच्या दुकानात मोदक, लाडू, बर्फी, काजुकतली आदी प्रसादाचे गोड पदार्थ बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाईतील भेसळविरोधात अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला आहे. ठाण्यातील मिठाईच्या दुकानांवर एफडीआय ‘वॉच’ ठेवणार असून बाप्पाच्या प्रसादात ‘पाप’ केल्यास याद राखा, असा इशारा मिठाईच्या दुकानदारांना देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील मिठाईच्या दुकानांमध्ये अन्न व औषध विभागाच्या वतीने धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. मिठाई तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि मिठाईचे नमुने ताब्यात घेतले जात आहेत. ताब्यात घेतलेले नमुने प्रयोगशाळेत पाठवून पुढील कारवाई केली जाणार आहे. यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकाला भेसळमुक्त, सकस, आरोग्यदायी अन्न व मिठाई मिळावी यासाठी मिठाईच्या दुकानांवर धाडी टाकल्या जात आहेत. ही तपासणी मोहीम आठवडाभर सुरू राहणार आहे.
तपासणी कशाची?
मिठाई बनविण्यासाठी लागणारे दूध, मावा, तेल, मैदा, तूप अशा प्रकारचा कच्चा माल निर्भेळ व सकस असावे. मिठाई बनविण्यासाठी लागणारी भांडी, किचन स्वच्छ असावे.
पदार्थ बनविणारे कारागीर निरोगी आणि टापटीप असावेत याची पाहणी केली जात आहे.
मिठाई तसेच तत्सम पदार्थ बनविताना, विकताना तत्पर असले पाहिजे. लोकांच्या आरोग्याविषयी कुठल्याही प्रकारची निष्काळजी सहन केली जाणार नाही. दोषी आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
श्रीकांत करकाळे, सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन