
कोल्हापूर जिह्यात पावसाची रिपरिप सुरूच असून, रात्रभर कधी संततधार, तर कधी अतिवृष्टी झाली. राधानगरीसह सर्व धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. त्यामुळे नद्या-नाल्यांना पूर येऊन पात्राबाहेर पडलेले पाणी काठावरील शेतांमध्ये आणि नागरी वस्त्यांमध्ये शिरू लागले आहे. ऐतिहासिक राधानगरी धरणाचे सर्व सातही स्वयंचलित दरवाजे अजूनही उघडलेले असून, 11 हजार 500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत आणखी सहा ते सात फुटांची वाढ झाली असून, दुपारी चारच्या सुमारास 36 फूट 9 इंचांवर गेलेल्या पंचगंगेची वाटचाल ‘इशारा’ (39 फूट) व ‘धोका’ (43 फूट) पातळीकडे सुरू आहे.
जिह्यात सकाळी 10पर्यंत 24 तासांत सरासरी 65.5 मि.मी. आणि गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 151.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिह्यातील 80 बंधारे पाण्याखाली गेले असून, 11 मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी सतर्क राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. हवामान वेधशाळेने मंगळवार व बुधवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. प्रशासनाच्या वतीने पावसाची प्रत्येक चार तासांच्या आकडेवारीवरून अंदाज घेतला जात आहे.
गेल्या 24 तासांत पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱयावरील पाणीपातळी सात फुटांनी वाढली आहे. राधानगरी धरणातून सकाळी 11 हजार 500 क्युसेक, ‘दूधगंगा’तून 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून 67 हजार 700 क्युसेक विसर्ग सुरू असून, हा विसर्ग 75 हजारांपर्यंत वाढणार आहे. वारणा धरणातून 29 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिह्यात पडणाऱया पावसावरही जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.
आवश्यक तेथे नागरिकांच्या स्थलांतराची तयारी
हवामानाचा अंदाज, होणारा पाऊस, धरणांतून होणारा पाण्याचा विसर्ग आणि पुढील प्रस्तावित विसर्ग याचे नियोजन करण्यात येत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट असून, जिह्यात पडणाऱया पावसावर व पंचगंगा नदीच्या पाणीपातळीवर प्रशासनाचे लक्ष आहे. वाढत्या पाणीपातळीनुसार आवश्यक त्या ठिकाणी जिह्यातील नागरिकांचे निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. कुरुंदवाड शहर व शिरोळ तालुक्यातील काही गावांतील नागरिकांच्या स्थलांतराबाबत सूचना देण्यात येत आहेत.