
Asia Cup 2025 साठी 19 ऑगस्ट रोजी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार म्हणून शुभमन गिलच्या खांद्यावर जबाबादारी सोपवण्यात आली आहे. परंतु या संघात दर्जेदार खेळाडू, आयपीएल विजेत्या संघाचा कर्णधार आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अशातच आता श्रेयस अय्यरचे वडील संतोष अय्यर यांनी श्रेयसला संघात स्थान न दिल्यामुळे BCCI वर प्रश्न उपस्थित केले आहेत.
संतोष अय्यर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली खंत बोलून दाखवली. “मला नाही माहित श्रेयसला टीम इंडियाच्या टी-20 संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी काय कराव लागले. दिल्ली कॅपिटल्स पासून कोलकाता नाईट रायडर्स आणि केकेआर पासून पंजाब किंग्ज पर्यंत श्रेयसने प्रत्येक वर्षी IPL मध्ये धमाकेदार प्रदर्शन केले आहे. त्याच्या नेतृत्वात केकेआरने 2024 साली आयपीएलच विजेतेपद जिंकल आणि 2025 मध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार असताना संघाला फायनलपर्यंत घेऊन गेला.” असं म्हणत त्यांनी BCCI ला प्रश्न विचारला आहे की, संघात स्थान मिळवण्यासाठी त्याने आणखी काय केलं पाहिजे.
“मी असं म्हणत नाही की, तुम्ही त्याला टीम इंडियाचा कर्णधार करा. पण कमीत कमी त्याची संघात निवड तरी करा. तो नेहमी फक्त एवढच म्हणतो की, हे माझं नशीब आहे. तुम्ही यामध्ये काही करू शकत नाही. तो नेहमी शांत असतो, कधी कोणावर आरोप करत नाही. परंतु तो आतून खुप निराश आहे.” अशी खंत संतोष अय्यर यांनी बोलून दाखवली.
अय्यरवर अन्याय झालाय! आशिया कप संघातून वगळल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या पाठीशी
श्रेयस अय्यरने मागील काही वर्षांमध्ये शांत, संयमी आणि दमदार कामगिरी केली आहे. मिळेल त्या संधीच त्याने सोनं करण्याचा प्रयत्न केला आहे. आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्ज संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. गेल्या 11 वर्षांमध्ये जो संघ प्लेऑफसाठी पात्र होऊ शकला नाही, त्या संघाला श्रेयसने फायनलपर्यंत पोहोचवलं. संघाच नेतृत्व करताना त्याने 17 सामन्यांमध्ये 50.33 च्या सरासरीने 604 धावा केल्या. तसेच पाच वेळा बिनबाद मैदानातून बाहेर येण्याची कामगिरी सुद्धा त्याने केली होती. तसेत देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची बॅट चांगली तळपली आहे. असे असताना संघात स्थान न दिल्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे.