
सुरक्षित आणि निर्विघ्नपणे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लातूर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. ‘आपले लातूर सुरक्षित लातूर’ या उपक्रमाअंतर्गत सर्व गणेश मंडळांना मंडपामध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लातूर पोलीस दलाच्या या फतव्याची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
सुरक्षित लातूरसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या करिता विविध उपाय योजना करण्यात येणार आहेत. अवघ्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सवाला धुमधडक्यात सुरुवात होणार आहे. गणेशोत्सव काळात संपूर्ण महाराष्ट्रात नवचैत्यन्याचे वातावरण असते. मोठ्या संख्येने लोकं एकमेकांना भेटतात, सण साजरा करतात. त्यामुळे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि विशेष करून महिलांच्या सुरक्षेसाठी गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
गणेश मंडळानी पेंडाल व परिसरामध्ये कमीत कमी 4 सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, असे बंधन गणेश मंडळांना करण्यात येणार आहे. तसेच जे गणेश मंडळ 4 सीसीटीव्ही कॅमेरे लावतील त्या गणेश मंडळाचा संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सत्कार करुन प्रशस्तीपत्र देणार आहेत. जे गणेश मंडळ 8 सीसीटीव्ही कॅमेरे लावतील त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी हे सत्कार करून प्रशस्तीपत्र देतील. तसेच जे गणेश मंडळ 16 सीसीटिव्ही कॅमेरे लावतील त्यांचा जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत सत्कार करुन प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.
गणपती उत्सव संपल्यानंतर गणेश मंडळाने लावलेले कॅमेरे हे त्यांच्या गावातील/चौकामध्ये महत्वाच्या ठिकाणी कायमस्वरुपी लावण्यात यावेत, जेणे करुन लोकसहभागातून सुरक्षित लातूर ही संकल्पना राबविण्यात मदत होईल. गणेश मंडळांनी सीसीटीव्ही बसवल्यास महिला आणि युवतींच्या सुरक्षेला मदत/ प्रोत्साहन मिळेल. गणेश मंडळांनी आपल्या वर्गणीचा सदुपयोग करून लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, गणेश मंडळांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, वेळेचे बंधन पाळावे, ध्वनिप्रदूषण टाळावे आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.