
वस्तू आणि सेवा करात घट करण्याला जीएसटी परिषदेच्या मंत्रीगटाने मंजुरी दिली आहे. जीएसटीच्या नव्या दरांनुसार आरोग्य आणि जीवन विम्याच्या वैयक्तिक पॉलिसींवरील 18 टक्के जीएसटी काढून टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे विम्याचा हप्ता कमी होणार आहे. बैठकीत टॅक्स स्लॅब 12 आणि 28 टक्क्यांवरून 5 आणि 18 टक्के करण्याला मान्यता देण्यात आली. त्यामुळे दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किंमती घटणार आहेत.
आयुर्विमा आणि आरोग्यविमा यांवरील सध्या लागू असलेला 18 टक्के जीएसटी पूर्णतः हटवण्याच्या प्रस्तावाला सर्व राज्यांच्या मंत्र्यांनी पाठिंबा दर्शवला. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत एक मोठी भेट मिळणार आहे. आम्ही पुढच्या पिढीतील जीएसटी सुधारणा आणत आहोत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात केली होती. त्यानुसार जीएसटीच्या मंत्रीगटाने आज केंद्र सरकारचा प्रस्ताव स्वीकारला.
या वस्तू स्वस्त होणार?
सुका मेवा, ब्रँडेड मीठ, टूथ पावडर, साबण, केसांचे तेल, सामान्य प्रतिजैविक, वेदनाशामक औषधे, प्रक्रिया केलेले अन्न, स्नॅक्स, फ्रोजन केलेल्या भाज्या, कंडेन्स्ड मिल्क, काही मोबाईल, संगणक, शिलाई मशीन, प्रेशर कुकर, गीझर यांसारख्या वस्तू स्वस्त होतील.