पृथ्वी शॉने महाराष्ट्रासाठी पदार्पणात ठोकले शतक

मूळचा मुंबईकर असलेल्या पृथ्वी शॉने प्रतिष्ठत बुची बाबू ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रासाठी आपल्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावत दमदार कामगिरी केली. चेन्नईतील आयसी गुरुनानक कॉलेज ग्राऊंडवर त्याने ही कामगिरी करत या शहराशी असलेल्या आपले खास नाते पुन्हा एकदा अधोरेखित केले. 2018 मध्ये पहिल्या कसोटी शतकानंतर या 25 वर्षीय खेळाडूची कारकीर्द अस्थिर फॉर्म, शिस्तभंगाची कारवाई आणि फिटनेसविषयक चिंतेमुळे घसरत गेली होती. या वर्षाच्या सुरुवातीला मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) पृथ्वी शॉला रणजी संघातून वगळले होते. त्यानंतर शॉला नवी सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्रात जाण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावे लागले. महाराष्ट्रासाठी पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉने चेन्नईत छत्तीसगडविरुद्ध 141 चेंडूंत 111 धावा केल्या. या खेळीमुळे त्याला नव्या संघाशी नातं जोडण्याची संधी मिळाली. छत्तीसगडच्या 252 धावांच्या प्रत्युत्तरात महाराष्ट्राने 217 धावा केल्या.