पुनिया, चानू दुखापतीमुळे बाहेर; महिला आशिया कप हॉकीसाठी संघ जाहीर

आशिया कप हॉकी स्पर्धेत वर्ल्ड कपचे तिकीट मिळवण्याच्या आशेने हिंदुस्थानी महिला हॉकी संघ मैदानात उतरणार आहे. मात्र या मोहिमेत संघाला कडव्या प्रतिस्पर्ध्यांसह दुखापतींच्या समस्यांनाही सामोरे जावे लागणार आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या 20 सदस्यीय संघातून दोन अनुभवी खेळाडूंची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली. अनुभवी सविता पुनिया आणि मधल्या फळीतली सुशीला चानू. सविताला टाचेला झालेली दुखापत प्रशिक्षणादरम्यान वाढली, तर सुशीला बराच काळ गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. दुखापतीमुळे या प्रतिभावान खेळाडूंची आशिया कपसाठी संघात निवड होऊ शकली नाही. या दोघींच्या अनुपस्थितीत कर्णधार सालिमा टेटेवर अतिरिक्त जबाबदारी येणार आहे. तर बिचू देवी अखेर आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांच्या सावलीतून बाहेर पडून मोठय़ा स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यास उत्सुक असेल.

हिंदुस्थानी संघ गोलरक्षक बन्सरी सोलंकी, बिचू देवी खरिबाम. डिफेंडर मनीषा चौहान, उदिता, ज्योती, सुमन देवी थोउदम, निक्की प्रधान, इशिका चौधरी. मिडफिल्डर नेहा, वैष्णवी फलके, सालिमा टेटे, शर्मिला देवी, लालरेम्सियामी, सुनेलिता टोप्पो. फॉरवर्ड्स नवनीत कौर, रुतुजा पिसाळ, ब्युटी डुंगडुंग, मुमताज खान, दीपिका, संगीता कुमारी.