
प्रख्यात उद्योजक एलॉन मस्क यांनी सापाची उपमा दिलेले सर्जियो गोर यांना अमेरिकेचे हिंदुस्थानातील नवे राजदूत म्हणून पाठवण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. गोर हे ट्रम्प यांचे विश्वासू मानले जातात.
जागतिक पातळीवर महत्त्वाच्या असलेल्या देशांमध्ये आपली खास माणसे पाठवण्याकडे ट्रम्प यांचा कल आहे. त्याचाच भाग म्हणून गोर हिंदुस्थानात येत आहेत. एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्यात दुरावा येण्यास गोर हेच कारणीभूत असल्याचे मानले जाते. गोर यांच्यामुळेच मस्क यांनी सरकारच्या सल्लागार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मस्क व गोर यांच्यात जाहीर वादही झाला होता. त्यावेळी मस्क यांनी गोर यांना सापाची उपमा दिली होती.
असा राष्ट्राध्यक्ष पाहिला नव्हता – एस. जयशंकर
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीवर हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोचक टिप्पणी केली आहे. ‘ट्रम्प यांची जगातील वेगवेगळय़ा देशांशी वागण्याची पद्धत अजब आहे. आतापर्यंतच्या कुठल्याही अध्यक्षांचे वर्तन असे नव्हते. परराष्ट्र धोरण सार्वजनिक कार्यक्रमासारखे राबवणारा अध्यक्ष कधी पाहिला नव्हता, असे जयशंकर म्हणाले.